नवीदिल्ली : शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असेही निहार ठाकरे यावेळी ठामपणे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, तशी स्थगिती दिलेली नाही. आता जेव्हा सुनावणी सुरु होईल, तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देवू,असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. “सर्वोच्च न्यायालयात समोरच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पुढच्या तारखेपर्यंत कोणत्याही बाजूच्या आमदार-खासदारांना अपात्र करता येणार नाही. आम्हाला दोन आठवडे उत्तर दाखल करण्यास दिले आहेत. पण आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका वकील निहार ठाकरे यांनी मांडली.




