रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे श्री गणेश मंदिरात भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य, भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड (वस्त्रसंहिता) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२७ पासून अत्यंत काटेकोरपणे लागू केला जाणार असून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासंदर्भातील सूचना फलकही लावण्यात आले आहेत. या निर्णयानुसार हाफ पँट, बर्मुडा, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, बीचवेअर तसेच अंगप्रदर्शन करणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर व चित्रे असलेले कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गणपतीपुळे हे समुद्रकिनारी पर्यटनस्थळ असल्यामुळे अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरून थेट मंदिरात येतात. मात्र नव्या नियमांनुसार अशा वेशभूषेला प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिर परिसरात धार्मिक वातावरण आणि शिस्त कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवीन वस्त्रसंहितेनुसार महिला आणि पुरुष दोघांनीही अंगभर, सात्विक, सभ्य आणि पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. मात्र १० वर्षांखालील मुला-मुलींना या ड्रेस कोडमधून सूट देण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबवली जाणार असून सूचना फलक, माहितीपत्रके आणि इतर माध्यमांतून नियमांची माहिती दिली जाणार आहे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, नववर्षापासून गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाने योग्य वेशभूषेतच दर्शनासाठी यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.






