पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभाग-१ ने मार्केट यार्ड परिसरातील बी. जी. गोयल अँड कंपनी या दुकानावर १४ जुलै रोजी छापा टाकून तब्बल ८ लाख १४ हजार ६३० रुपये किमतीचे ४ हजार १७२ किलो खाद्यपदार्थ जप्त केले. हे दुकान केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्याने एफडीएने चार खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी जप्त केले आहेत. यामध्ये ‘संत’ ब्रँड हळद पावडर, ‘साधू’ ब्रँड हळद पावडर, ‘ग्रीन लीफ’ ब्रँडचे तीळ आणि ‘मधुर’ ब्रँडचे सोया मिनी चंक्स यांचा समावेश आहे. एफडीएच्या प्राथमिक तपासणीत परवाना नसताना स्टोअर-रूम चालविणे, लेबलिंग नियमांचे उल्लंघन तसेच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने संबंधित दुकानाला ‘स्टॉप-बिझनेस नोटीस’ बजावत पुढील आदेशापर्यंत व्यवसाय थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात ५९८ किलो ‘संत’ ब्रँड हळद पावडर, १,२५८ किलो ‘साधू’ ब्रँड हळद पावडर, ५३८ किलो ‘ग्रीन लीफ’ तीळ आणि १,७७८ किलो ‘मधुर’ सोया मिनी चंक्सचा समावेश आहे.
एफडीएने स्पष्ट केले की, भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील अन्नधान्य व मसाला व्यवसायांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार आहे. जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पुणे विभागात इतर ठिकाणीही अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात दूध भेसळीच्या दोन प्रकरणांमध्ये संशयित दूध नष्ट करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पुण्यातील बोपोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी प्रतिबंधित गुटखा व इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यभर अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.





