पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट कायम आहे. अनेक भागांत १०अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, उपनगर आणि पुण्यात धुक्याची चादर आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे. राजस्थानच्या भागात हे वारे वाहत असून, त्यापासून ईशान्य अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुके दिसून येत आहे. दरम्यान, कोकण, मराठवाड्यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर पश्चिम भारतात आगामी तीन दिवस सर्वांत कमी तापमान असेल. भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पाऊस, तर उत्तरेकडे पाऊस आणि गोठवणारी थंडी असे दोन्ही वातावरण असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार, काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणीसह इतर भागात पारा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होईल. तर, विदर्भात पुढील चार दिवस वातावरण कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत असल्याने, तर कधी पाऊस कधी उकाडा, यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक बोटी गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी, उंबरगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर मासे कमी मिळत असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या असल्याचे चित्र पाहिला मिळत होते.