नवी मुंबई : बँकेतून काढलेली रक्कम घेऊन पायी चालत घराच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी खेचून पलायन केल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
अव्वा राममूर्ती (वय ६९) हे खारघर सेक्टर-११ मध्ये राहण्यास आहेत. राममूर्ती यांना घराचे नूतनीकरण करायचे असल्याने एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी बँकेतून दोन लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यानंतर ती पिशवीत ठेवून ते पायी चालत आपल्या घराच्या दिशेने जात असताना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी राममूर्ती यांच्या हातातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी खेचून पलायन केले. याबाबत त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.