मुंबई : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत-जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड् माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या मोहिमेअंतर्गत “विकसित भारत पदयात्रा” उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती, एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव, राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे, नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार@१५० एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे. या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणे, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे. राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ३ दिवसांच्या कालावधीत ८ ते १० कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, आत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, MY भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकहरता आयोजक म्हणून असणार आहे. निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये (नुक्कड नाटक)., नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे,स्वच्छता मोहिमांचा समावेश, महिला कल्याण शिबीरे, योग आणि आरोग्य शिबीरे, वोकल फॉर लोकल किंवा स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान “गर्व से स्वदेशी” प्रतिज्ञा,शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्ये, स्थानिक कलांवर आधारित कार्यक्रम-संगीत, नृत्य, लोकनृत्य इत्यादी, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. https://mybharat.gov.in/pages/unity_march देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी “सरदार@150 एकता मोहिमेत” सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार वेबसाईट: https://mybharat.gov.in भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सहभागातून आधुनिक, सर्वसमावेशक तसेच सुधारित राज्य “युवा धोरण” साकारण्यात येत आहे. या अनुषंगाने १३ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींकडून विविध विषयांवरील विचार, मते आणि सूचना ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. हे युवा धोरण जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलित राहून युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन, वैविध्यतेचे ज्ञान आणि नागरिक जबाबदाऱ्यांची जाणीव यासाठी सक्षम व्यासपीठ देईल. राज्याचे सुधारित युवा धोरण युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. क्रिडा व युवक कल्याण मंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्य विकासावरील सूचना या माध्यमातून मागविल्या जाणार आहेत. या धोरणात लिंग, धर्म, जात, भाषा, उत्पन्न, ग्रामीण-नागरी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय सर्व गटांचा विचार करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणताही तरुण तरुणी वंचित राहणार नाही. युवा धोरणाद्वारे तरुणांना निर्णय प्रक्रियेत सहभाग, शिक्षणाचा हक्क, रोजगार व उद्योजकता संधी, आरोग्य, पर्यावरण, निवारा, कला-क्रीडा आणि सांस्कृतिक सहभाग यांसारखे मूलभूत अधिकार दिले जाणार आहेत, असेही मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले. हे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असेही ॲड कोकाटे यांनी सांगितले. महिला व बाल विकास, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास इत्यादी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण युवा योजना सुरू केल्या जाणार आहेत. युवा धोरणात मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या नव्या आव्हानांचाही समावेश असेल, असेही मंत्री क्रीडा ॲड. कोकाटे यांनी सांगितले.








