वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारी परिषदेने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत समान मानधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, महिला क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. अचानकच झालेल्या या पगार वाढीमुळे देशांतर्गत क्रिकेटवर आणि त्याच्या व्यावसायिकतेमध्ये मोठे बदल होऊ शकतात. या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वरिष्ठ महिला खेळाडूंना सध्याच्या २० हजार रुपयांच्या दैनंदिन सामन्याच्या मानधनाऐवजी आता ५० हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. हे मानधन अंतिम ११ जणींत निवड होणाऱ्या खेळाडूंसाठी असेल. सामन्यांमध्ये राखीव खेळाडूंना १० हजार रुपयांऐवजी आता २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
मानधनवाढीचा निर्णय सर्व प्रकारच्या क्रिकेट पद्धतीत घेण्यात आला आहे. आता राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेतील सामन्यात अंतिम ११ प्लेयर्समध्ये निवडलेल्या खेळाडूंना २५ हजार रुपये, तर राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळणार आहे. महिलांच्या मानधन वाढीच्या निर्णयामुळे आता एखादी महिला खेळाडू सर्व क्रिकेट प्रकारात पूर्ण हंगाम खेळली असेल तर तिला किमान १२ ते १४ लाख रुपये कमवता येतील. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांमधील पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली आहे. नव्या निर्णयानुसार, पंच आणि सामनाधिकारी यांना आता ४० हजार रुपये मानधन दिले जाईल. बाद फेरीसाठी त्यांचे मानधन ५० ते ६० हजार रुपये इतके असेल. रणजी स्पर्धेत साखळी सामन्यासाठी पंचांना १.६० लाख, तर बाद फेरीसाठी अडीच लाख रुपये इतके मानधन मिळेल. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेट संघांना आणि देशांतर्गत सगळ्यांत सामन्यांचे नियोजन मदत होईल तसेच व्यावसायिकेमध्ये वाढ होईल. एवढेच नाही तर या बदलामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहण्यास प्रोत्साहन मिळेल.







