मुंबई : जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये समावेश असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये दारात लटकून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परदेशातून आलेल्यांना मुंबईकरांना अशाप्रकारे प्रवास करताना पाहून आश्चर्य वाटतं. मात्र आता लवकरच हा असला प्रवास मुंबईकरांना बंद करावा लागणार आहे. कितीही इच्छा झाली तर आता मुंबईकरांना दारात लटकून प्रवास करता येणार नाही. दंड ठोठावणे, पोलीस कारवाई, बंद दाराच्या लोकल ट्रेन यापेक्षाही जालीम उपाय रेल्वेनं यावर शोधला असून हा अंमलात आणल्यानंतर दारात सध्या ज्या पद्धतीने अर्धवट लटकत प्रवासी उभे राहतात तसं उभंच राहता येणार नाही.
खरं तर मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा दरम्यान ९ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये दारात उभे असलेले प्रवासी खाली पडले होते. पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणानंतरच लोकल प्रवासाच्या सुरक्षेबाबत एक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये एक रंजक गोष्ट समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने समिती गठित करून सविस्तर चौकशी अहवाल तयार करताना या अहवालात लोकलचे दरवाजे कायम उघडे असल्याने अनेक प्रवासी फुटबोर्डवरून किंवा डब्याच्या वरील पन्हाळीला लटकून प्रवास करतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. मुंब्रा दुर्घटनेचे हेच प्रमुख कारण असल्याचे चौकशी समितीने अधोरेखित केले होते. त्यानुसार दारांवरील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशी अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार एक अगदी छोटासा पण फारच परिणामकारक बदल करण्यात येणार आहे. लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना दारांच्या वरील बाजूला लावण्यात येणाऱ्या पन्हाळींची जागा बदलली जाणार आहे. पन्हाळी म्हणजेच ट्रेनच्या डब्ब्याच्या छप्परावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दारांवर लावण्यात आलेली यू शेप पट्टी. सध्या लोकलच्या दरवाजात उभे राहताना अनेकजण दाराच्या वर असलेल्या या पन्हाळीच्या फटीला धरून उभे राहता. त्यामुळे आता ही पन्हाळीच काढली जाणार असल्याने तिला पकडून लोकलच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांचे वांधे होणार आहेत. सध्या फक्त २ ते ३ डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे बदल करण्यात आले आहेत.







