नवी दिल्ली : भारत व न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार करार अंतिम झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर या कराराची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंडनेही एक्सद्वारे ही माहिती शेअर केली. विशेष म्हणजे या करारांतर्गत जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल इटलीपाठोपाठ आता थेट न्यूझीलंडमध्ये उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, पुढील पंधरा वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रालाही या कराराचा मोठा फायदा होईल. ते म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ते जीआय टॅग्ड उत्पादने, शेतकरी, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि सेवा क्षेत्रांपर्यंत सर्वांना याचा लाभ होणार आहे. न्यूझीलंडमध्ये या उत्पादनांची निर्यात करणे सोपे होईल. या करारामुळे तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील. पदवीधरांसाठी २ वर्षे, पदव्युत्तरांसाठी ३ वर्षे आणि पीएचडीधारकांसाठी चार वर्षांचा व्हिसा देण्यात आला आहे.







