मुंबई : देशात अनेक गणेश मंदिरं प्रसिद्ध आहे. यापैकीच एक आहे मुंबईतलं श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबईतल्या प्रभादेवी इथं असलेल्या या मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटिदेखील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आता या भाविकांसाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने एक निर्देश जारी केला आहे. यापुढे श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा लावण्याचे निर्देश श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा आणि न्यासाचे सदस्य यांच्यातर्फे देण्यात आले आहे. यामुळे गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आशिर्वादाचा भगवा टिळा लावला जाणारेय.
मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात देश-विदेशातील लाखो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवादरम्यान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. सिद्धिविनायक मंदिर १८०१ साली बांधलं गेल्याचं सांगितलं जातं. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराची बांधणीदेखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्यभागात असलेला घुमट संध्याकाळी विविध रंगांनी उजळून निघतो. सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर हे आहेत. गणेश भक्तांच्या अडचणी सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं पदभार स्विकारल्यानंतर सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. याशिवाय सुरक्षा आणि वाहतूक याकडे आमचं विशेष लक्ष असेल आणि यातील तृटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.