रायगड : माथेरान नगरपरिषदेने उभारलेल्या ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकण्याची दुसरी घटना समोर आल्याने या सुविधेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इको पॉईंट परिसरातील ई-टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटक गेल्यानंतर आतील दरवाज्याचे हँडल अचानक तुटल्यामुळे ती आतमध्येच अडकून पडली. बाहेर उभ्या असलेल्या तिच्या पतीला महिलेने आरडाओरडा करून माहिती दिल्यानंतर स्थानिक नागरिक तत्काळ मदतीला धावले. स्थानिक व्यावसायिक रेखा पाटील यांनी अडकलेल्या महिलेला धीर दिला, तर भरत कांरडे यांनी प्रसंगावधान राखत बाहेरील दरवाज्याचे हँडल तोडून तिची सुखरूप सुटका केली. काही मिनिटांचा उशीर झाला असता गंभीर दुर्घटना घडू शकली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर संबंधित महिला पर्यटकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,” असे म्हणत तिने हाताला झालेली दुखापत दाखवली आणि नगरपालिकेच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. तिच्या पतीनेही निकृष्ट दर्जाच्या ई-टॉयलेटबाबत संताप व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पर्यटक अडकण्याची ही दुसरी घटना असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ई-टॉयलेटच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या ई-टॉयलेटच्या खरेदी प्रक्रियेवरही नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. प्रशासकीय काळात माथेरान नगरपरिषदेने सुमारे ३८ लाख ७० हजार रुपये खर्च करून ही सुविधा उभारली होती. मात्र, बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन खरेदी करण्यात आल्याचा आरोप होत असून, या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित माहितीची मागणी करूनही नगरपरिषदेकडून ती उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या घटनेनंतर माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “हे ई-टॉयलेट नसून मृत्यूचा सापळाच आहे. महिलेच्या पतीच्या लक्षात हा प्रकार आला नसता तर गुदमरून मोठी दुर्घटना घडली असती. नगरपालिकेने तातडीने कारभार सुधारावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा दिला. सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्यामुळे ई-टॉयलेटच्या तांत्रिक सुरक्षिततेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधील सार्वजनिक सुविधांच्या गुणवत्तेवर आणि देखभालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






