मुंबई : राज्यात पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू झाली. राज्यातील निवडणुकांच्या आधी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पहायला मिळणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. राज्यातील महायुती सरकारकडून सत्ताधारी आमदारांना अधिक निधी दिला जाते, असा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. अशाच रोहित पवार यांनी एक्सवरून मोठा दावा केलाय. रोहित पवार यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये राज्यातील महायुती सरकारवर कमिशनखोरीचा आरोप केला आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे आणि हा रोष लोकसभा निवडणुकीत दिसून आला आता विधानसभेत देखील दिसेल असे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये राज्यातील महायुती सरकारवर कमिशनखोरीचा आरोप केला आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे आणि हा रोष लोकसभा निवडणुकीत दिसून आला आता विधानसभेत देखील दिसेल असे त्यांनी म्हटले आहे. पोस्टच्या अखेरीस त्यांनी यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असल्याचे म्हटले आहे.
गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे. आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाईल ज्यांच्या सहिने पास होते त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची २० हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत. सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे. अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटींची कर्जे काढली जातील, हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार आहे!