मुंबई : उडीसा राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अमलीपदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. आरोपींकडून १११ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. तस्करीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहनेही एनसीबीने जप्त केली आहेत. याप्रकरणात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत एनसीबी तपास करत आहे. ओडीसा राज्यातून मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारवर एनसीबीने तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यावेळी पुणे व मुंबईत गांजाचे वितरण होत असून पुण्यातील गांजा विक्रेत्यांसाठी लवकरच मोठ्याप्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीच्या आधारे एनसीबी आरोपींचा शोध घेत होती. पण आरोपी लपण्याचे ठिकाण, मार्ग, मोबाईल क्रमांक वारंवार बदलत होते. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवून एनसीबीने आरोपींबाबत मोठ्याप्रमाणात माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारे नगर येथील पाथर्डी जवळ सापळा रचण्यात आला होता. या कारवाईत १११ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील रहिवासी असलेल्या चौघांना अटक करण्यात एनसीबी मुंबईला यश आले आहे. तसेच एनसीबीने गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने जप्त केली आहेत. हा गांजा पुण्यात वितरणासाठी आणण्यात आला होता. तो स्थानिक विक्रेत्यांना पूरवण्यात येणार होता. पण त्यापूर्वी एनसीबीने पुण्यात राहणाऱ्या चार तस्करांना अटक केली. एस.एम. मोरे, एल. शेख, आर. मोहित व एस. शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी सुरू असून याप्रकरणी मुंबई एनसीबी अधिक तपास करत आहे.