मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज, गुरुवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार असून या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारून अंतिम फेरी गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअम मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सामना संपल्यानंतर प्रेक्षकांना घरी पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) भुयारी मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार आज मेट्रो ३ ची सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. एमएमआरसीच्या या निर्णयामुळे उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तुल्यबळ भारत आणि इंग्लंड संघांमधील हा सामना वानखेडे स्टेडिअम होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे आजचा निर्णायक सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय संघाचे चाहते मैदानावर उपस्थित राहतील. प्रेक्षकांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रो ३ मार्गिकेचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. मेट्रो ३ मार्गिकेतील चर्चगेट स्थानक वानखेडे मैदानाजवळ आहे. त्यामुळे या स्थानकावर उतरून मैदानावर पोहोचणे सोपे होणार आहे. उपांत्य फेरीचा सामना रात्री सुमारे ११ वाजता संपण्याची शक्यता आहे. नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो ३ मार्गिकेची शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता कफ परेड आणि आरे स्थानकावरून सुटते. त्यामुळे सामना संपल्यानंतर प्रेक्षकांना लोकल, बेस्ट किंवा टॅक्सीचा पर्याय वापरावा लागला असता. मात्र, प्रेक्षकांच्या सोयीसाठी एमएमआरसीने सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार आज, गुरुवारी चर्चगेट मेट्रो स्थानकातून रात्री ११.५९ वाजता आरे तसेच कफ परेडसाठी शेवटची मेट्रो सुटणार आहे. या अतिरिक्त फेरीमुळे सामना संपल्यानंतर प्रेक्षकांना घरी किंवा इच्छित स्थळी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.







