विरार : मुंबईतील लोकल रेल्वेत किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी उपनगरी रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रवाशांच्या बॅगांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून नालासोपारा, वसई, विरार आणि मिरा रोड या गर्दीच्या स्थानकांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या बॅगांमध्ये कोणतेही धारदार शस्त्र किंवा संशयास्पद वस्तू आढळू नयेत, यासाठी प्रत्येक संशयास्पद बॅगेची कसून तपासणी केली जात आहे. अलीकडेच लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाची चाकूने हत्या झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विरार येथील २२ वर्षीय मयंक रमेश लोहार हा अंधेरीतील एका खासगी कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. काम आटोपून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या जलद लोकलने घरी परतत असताना मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा उघडा असल्याने त्याने एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्याची विनंती केली. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले. आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढून मयंकच्या पोटावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लोकल प्रवासातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून रेल्वे प्रशासनाने तत्काळ सुरक्षा उपाययोजना अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे पोलिसांच्या या विशेष मोहिमेत केवळ धारदार शस्त्रे किंवा संशयास्पद वस्तूंची तपासणीच केली जात नाही, तर मद्यप्राशन करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी गाड्यांमध्ये वाद, मारामाऱ्या आणि इतर गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी नियमित तपासणी, गस्त आणि प्रवाशांवर देखरेख वाढविण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले की, लोकल रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर अनेक प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या या सुरक्षा मोहिमेमुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. पोलिसांनी नागरिकांना तपासणीदरम्यान पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले असून रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






