पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी सोमवारी हा निकाल दिला. यापूर्वी २५ जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी घडलेल्या या घटनेने राज्यभर संताप व्यक्त झाला होता. खटल्यादरम्यान सरकार पक्ष, बचाव पक्ष तसेच पीडित बालिकेच्या कुटुंबीयांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाल्याची माहिती देत संबंधित कलमांनुसार होणाऱ्या शिक्षेचीही माहिती दिली होती.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ स्वरूपाचा असल्याचे सांगत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजमन हादरवणारे असल्याने कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात असूनही अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. आपल्या बाजूच्या समर्थनार्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वपूर्ण निकालांचा संदर्भ न्यायालयासमोर मांडला. बचाव पक्षाकडून आरोपीची बाजू मांडण्यात आली होती. या खटल्यातील न्यायवैद्यकीय तपास, डीएनए अहवाल, चित्रिकरण यंत्रणांमधील नोंदी, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांचा सखोल विचार करून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तपासात पीडित बालिकेच्या शरीरावर अनेक गंभीर दुखापती आढळून आल्या होत्या. तसेच आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लैंगिक अत्याचार, खून, विनयभंगाच्या उद्देशाने बळजबरी करणे यासह इतर संबंधित कलमे आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व आरोपांना मान्यता देत आरोपीला दोषी ठरविले आणि या प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत फाशीची शिक्षा सुनावली. हा निर्णय अल्पवयीन मुलांवरील गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायव्यवस्थेची कठोर भूमिका अधोरेखित करणारा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील शिक्षेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुढील उच्च न्यायालयीन मान्यता आवश्यक राहणार असून त्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.







