पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने बचत गटांच्या सहकार्याने सुरू केलेला उपक्रम यंदाही प्रभावी ठरत आहे. दापोडी येथे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या विशेष प्रकल्पातून निर्माल्यातील फुलांपासून सुगंधी धूप, अगरबत्ती आणि कंपोस्ट खत तयार केले जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवात शहरभरातून तब्बल २९४ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून त्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यामुळे पूर्वी दुर्गंधी आणि प्रदूषणाचे कारण ठरणारे निर्माल्य आता सुगंधी उत्पादनांमध्ये रूपांतरित होत आहे. वर्षभर मंदिरांमध्ये अर्पण होणारी फुले, हार तसेच पिंपरीतील फुलबाजारात जमा होणारे निर्माल्य चार महिला बचत गटांच्या माध्यमातून गोळा केले जाते. त्यानंतर फुले वेगळी करून त्यापासून सुगंधी पावडर, धूप कांडी, अगरबत्ती आणि सेंद्रिय कंपोस्ट खत तयार केले जाते. गणेशोत्सवादरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाने विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन केंद्रे उभारली होती, जेणेकरून निर्माल्य इतर कचऱ्यात मिसळू नये. याशिवाय बचत गटातील महिलांनी घरोघरी जाऊनही निर्माल्य संकलित केले. तयार होणारे कंपोस्ट खत उद्याने, बागा, गृहनिर्माण सोसायट्या तसेच शेतीसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिले जात असून या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांना रोजगाराची संधीही मिळत आहे.
गणेशोत्सवात नदी, तलाव आणि नाल्यांमध्ये निर्माल्य टाकल्याने जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. ही समस्या कमी करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना निर्माल्य थेट पाण्यात न टाकण्याचे आवाहन केले होते. विसर्जन घाटांवर उभारण्यात आलेल्या विशेष कुंडांमध्ये निर्माल्य जमा करण्यात आल्याने नदी आणि तलावांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन निर्माल्याबरोबरच शाडू मातीचेही संकलन करण्यात आले. संकलित निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून धूप, अगरबत्ती आणि कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमाला महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि आरोग्य विभागाचे सहकार्य लाभत असून लवकरच सामाजिक दायित्व निधी (CSR) अंतर्गत अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला बचत गटाच्या सदस्या राखी धर यांनी दिली. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होऊन अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, यंदा संकलित झालेल्या २९४ टन निर्माल्याचे वर्गीकरण करून ते बचत गटांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यापासून तयार होणाऱ्या धूप आणि अगरबत्त्यांमुळे पर्यावरणपूरक पुनर्वापराला चालना मिळत असून उर्वरित निर्माल्याची स्वतंत्रपणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. हा उपक्रम पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण यांचा उत्कृष्ट संगम ठरत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.






