छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याची १ लाख २० हजार रुपयांत विक्री करून त्या पैशांत दोन ब्रँडेड स्मार्टफोन आणि सुमारे ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करत मुकुंदवाडी पोलिसांनी आंतरराज्यीय बाळ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत जन्मदात्यांसह एकूण सात जणांना अटक केली आहे. हैदराबाद येथे नेण्यात आलेल्या बाळाची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला संरक्षणासाठी एका संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या पवार आणि तिची मुलगी सीमा रेशवाल या या व्यवहारातील प्रमुख मध्यस्थ होत्या. याशिवाय संगीता आव्हाड, स्वतःला डॉक्टर म्हणून सांगणारा सुरेश राजाराम गुंटुका आणि हैदराबादमधील उमा गंगाधर खटकमे यांच्यासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला ५ जुलै रोजी मुलगा झाला होता. आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी अवघ्या महिनाभराच्या बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी कौशल्या पवार आणि सीमा रेशवाल यांनी जन्मदात्यांकडून १ लाख २० हजार रुपये देऊन बाळाचा ताबा घेतला. त्यानंतर सीमाने हे बाळ तिची नातेवाईक संगीता आव्हाड हिला २ लाख ७० हजार रुपयांना विकले. पुढे संगीता आव्हाडने नांदेडमार्गे स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या सुरेश गुंटुका याच्या माध्यमातून हे बाळ हैदराबाद येथील उमा खटकमे हिला तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांना विकल्याचा आरोप आहे. अवघ्या ४८ तासांत हे बाळ चार वेगवेगळ्या व्यक्तींकडे फिरत तेलंगणात पोहोचल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे आणि देविदास खेडकर यांच्या पथकाने केला. सुरुवातीला सीमा रेशवाल चौकशीत सहकार्य करत नव्हती. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांविरोधातही कारवाईची तयारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर तिने संपूर्ण व्यवहाराची माहिती दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आणि सर्व सात आरोपींना अटक केली. या बाळ विक्री प्रकरणातील पैशांचा प्रवाह, संभाव्य इतर व्यवहार आणि या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.






