मुंबई : ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून मध्य रेल्वेकडून महिनाभर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाणार असून, यावेळी केवळ वैध तिकीट असणे पुरेसे ठरणार नाही. तिकिटासोबत आवश्यक ओळखपत्र आणि संबंधित सवलत किंवा विशेष आरक्षणासाठी लागणारी पात्रतेची कागदपत्रेही सोबत ठेवावी लागणार आहेत. ही मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवली जाईल. रेल्वे कर्मचारी प्रवाशांच्या तिकिटांसह त्यांची ओळख आणि संबंधित सवलतीसाठीची पात्रता तपासणार आहेत. विशेषतः सवलतीच्या तिकिटांवर, विशेष आरक्षण कोट्यांतर्गत, ई-पास किंवा प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर (PTO) वापरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे अत्यावश्यक आहे. PTO ही भारतीय रेल्वेतील पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी सवलतीची सुविधा असून, त्याद्वारे त्यांना नियमित भाड्याच्या सुमारे ३३ टक्के दरात रेल्वे तिकीट उपलब्ध होते. तपासणीदरम्यान तिकीट योग्य व्यक्तीच्या नावावर आहे का आणि संबंधित प्रवासी त्या सवलतीस पात्र आहे का, याचीही खातरजमा केली जाणार आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले की, सवलत किंवा विशेष आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी आवश्यक मूळ ओळखपत्र आणि पात्रतेची कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक आहे. एका तिकिटावर अनेक प्रवासी प्रवास करत असतील, तर किमान एका प्रवाशाकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक राहील. तपासणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत, तर संबंधित प्रवासी वैध तिकीट नसल्याप्रमाणे समजला जाऊ शकतो आणि रेल्वेच्या नियमांनुसार कारवाई होऊ शकते. या मोहिमेत अनारक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार असून, टीटीई विशेष मोबाईल ॲपच्या मदतीने तिकिटांची पडताळणी करतील. ओळखीसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा राज्य सरकारचे फोटो ओळखपत्र, विद्यार्थी ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे फोटो असलेले पासबुक आणि लॅमिनेटेड फोटो क्रेडिट कार्ड यांसारखी कागदपत्रे वैध मानली जाणार आहेत. मात्र, सवलतीच्या किंवा विशेष कोट्यातील तिकिटांसाठी केवळ ओळखपत्र पुरेसे नसून संबंधित पात्रतेची कागदपत्रेही दाखवावी लागतील. रेल्वे प्रशासनाच्या मते, या विशेष मोहिमेचा उद्देश तिकीट आणि आरक्षणातील गैरप्रकार रोखणे, महसुलाचे नुकसान टाळणे तसेच सवलती आणि विशेष सुविधांचा गैरवापर थांबवणे हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी तिकीटासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.






