अलिबाग : जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून, रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यभरात ४७१ सरपंच आणि ३ हजार १२० सदस्य पदांसाठी निवडणुका होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींमधील ३० सरपंच आणि १७० सदस्य अशा एकूण २०० जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार असून, २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुका कधी लागणार याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते.
राज्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट असून, काही ठिकाणी सरपंच व सदस्य पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. राजीनामे तसेच इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी या पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. ३० मार्चपासून निवडणूक प्रक्रियेचा प्रशासकीय टप्पा सुरू होणार आहे. तहसीलदारांकडून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४ ते १३ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, १७ एप्रिलला अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सांगली, वर्धा, वाशिम, गोंदिया आदी ३४ जिल्ह्यांतील एकूण २ हजार ४४४ ग्रामपंचायतींमधील ४७१ थेट सरपंच व ३ हजार १२० सदस्य अशा एकूण ३ हजार ५९१ रिक्त जागांसाठी निवडणुका होणार आहेत.







