पुणे : बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने कडक पावले उचलली असून, शहरात गेल्या १५ दिवसात तब्बल २३ हजार वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यातील सव्वा दोनशे वाहने ६ महिन्यांसाठी जप्त केली आहेत. तसेच, ट्रिपलशिट, राँग साईड तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह विरूद्ध ही कारवाई केली असून, यापुढील काळात अधिक तीव्र कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढ झाली आहे. मेट्रो तसेच इतर कामांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. दुसरीकडे या कोंडीत बेशिस्त वाहन चालकांमुळे भर पडत आहे. त्यासोबतच अपघाताला देखील निमत्रंण मिळत आहे. कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन वाहन चालक समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी या बेशिस्तांना चाप लावण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. मात्र, कारवाईनंतरही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना आता दंडासोबत वाहन जप्तीची देखील कारवाई सुरू केली आहे.
पुणे पोलिसांनी पहिल्या टप्यात राँग साईड, ट्रिपलशिट तसेच ड्रँक अँड ड्राईव्ह कारवाईला सुरूवात केली आहे. १ ते १५ ऑक्टोंबर या १५ दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध भागात तब्बल २२ हजार ७२७ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यातील २१५ वाहने जप्त देखील केली आहेत. हे वाहन ६ महिन्यांसाठी जप्त केले जात आहे. जेणेकरून यापुढे तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, अशी भूमिका यामागची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रात काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रात विविध चौकात वाहतूक नियमन करतात. शहर, तसेच उपनगरात बांधकामे सुरू आहेत. सिमेंट वाहतूक करणारे डंपर, काँक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांना गंभीर अपघात यामुळे काही भागात दिवसा बंदी आहे. परंतु, तरीही काही ठिकाणी ही वाहने धावत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यावरही कडक कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंधरा दिवसात केलेली कारवाई
राँग साईड – २१ हजार २८५
ट्रिपल सीट – २ हजार ८७२
ड्रंक अँड ड्राईव्ह – ५७०
जप्त केलेली वाहने – २१५