पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर अडथळ्यांची शर्यत पार करून आरोपींचा शोध घेणाऱ्या पुणे पोलिसांनी आता एक पाऊल सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकले आहे. शहरालगत असलेल्या सर्व टेकड्या, मैदाने तसेच घाट परिसराचे ऑडिट करत त्याठिकाणी आवश्यक अशा उपाययोजनांसाठी शासकीय पातळ्यांवर कारवाई सुरू केली आहे. या भागांमध्ये सीसीटीव्ही, मोबाईल कंपन्यांचे टॉवर, प्रकाश (लाईट्स) पोलिसांची विशेष गस्त तसेच उद्-घोषक (माईकवरून अनाऊसमेंट) सुरू केले जाणार आहे. येत्या काही दिवसात हे कामकाज पुर्ण केले जाणार आहे. तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक गस्त देखील या परिसरात राहणार आहे. निसर्ग सौंदर्य लाभलेल्या पुण्याच्या चहू बाजूला अन् शहरात टेकड्या, घाट तसेच मोठ-मोठी मैदाने आणि डॅमचे परिसर आहेत. पुण्यासोबतच जिल्ह्यात देखील किल्ले, डोंगर परिसर आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु, वाढत्या गुन्हेगारीमुळे हे परिसर धोकादायक ठरू लागली आहेत. पुण्यात हनुमान टेकडी, बाणेर, तळजाई, एआरएआय, खंडोबा माळ, पर्वती, तळजाई टेकडी, एनडीए मैदान व बोपदेव घाट, कात्रज जुना-नवीन रस्त्यालगत असलेली टेकडीसह खडकवासला डॅम आणि जिल्ह्यात किल्ले व डोंगर परिसर येतो.
बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर लुटारूंनी सामूहिक अत्याचार केला. मारहाण केली व लुटले देखील. त्यापुर्वी याच ठिकाणी मित्रासोबत गेलेल्या तरुणीला कारममध्ये जबरदस्तीने बसवत तिचा विनयभंग केला. केवळ बोपदेव घाट परिसरात गेल्या ९ महिन्यात तब्बल २४ घटनांची नोंद पोलिसाकंडे झाली आहे. लुटमार, विनयभंग तसेच अत्याचाराची एक घटना घडली आहे. बोपदेव घाटासोबतच बाणेर टेकडीवर पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लुटमार झाल्याची घटना घडली. त्यामुळे हे परिसर नागरिकांसाठी धोकाधायक ठरू शकले आहेत. बोपदेव घाट प्रकरणात पुणे पोलिसांना तांत्रिक गोष्टींचा प्रचंड अडथळा निर्माण झाला. बोपदेव घाटात लाईट्स नाहीत, मोबाईलला रेंज येत नाही. घाट तसेच परिसरात सीसीटीव्ही नाहीत, त्यामुळे गुन्हेगारांना याचा फायदा होतो. सराईत आरोपी अशा ठिकाणी जाण्यापुर्वीच मोबाईल फ्लाईट मोडवर टाकल्याने ते पोलिसांच्या तांत्रिक तपासात येतच नाहीत. बोपदेव घाट परिसरात हे प्रकर्शाने जानवले. त्यामुळे पोलिसांनी आता या भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. खबरदारीच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. मोबाईल कंपन्यांशी पुणे पोलिसांनी पत्र व्यवहार केला आहे. तर महावितरण तसेच पालिकाला देखील लाईट्सबाबत पत्र व्यवहार केला आहे.
अशा असतील उपाययोजना..!
- टेकडी व घाट परिसरात सीसीटीव्ही
- मोबाईल रेंज न येणाऱ्या सर्व ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जाणार
- उद्-घोषक योजना शहरासह घाट व टेकड्यांवर बसविली जाणार
- टेकड्या व घाट परिसरात लाईट्ची सुविधा केली जाणार
हे आवाहन..!
- एकट्याने रात्री-अपरात्री घाट तसेच टेकड्यांवर जाऊ नये…
- दुर्घटना घडलीच तर तत्काळ पोलिसांना कळवा
- मित्र-मैत्रिण असले तरीही रात्री या भागात जाने टाळावे
- घाट परिसरात विनाकारण खूप अंतर जाऊ नये