रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच कला आणि संस्कृतीला चालना देणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच साकार होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून माळनाका येथील स्कायवॉकचे रूपांतर आकर्षक ‘हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये करण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी हा स्कायवॉक उभारण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रमाणात त्याचा वापर होत नसल्याने या जागेचा अधिक उपयुक्त आणि सर्जनशील पद्धतीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच स्कायवॉकवर कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा यांचा संगम घडवणारी हँगिंग आर्ट गॅलरी उभारण्याची कल्पना प्रत्यक्षात येत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरील स्कायवॉकवर उभारली जाणारी अशा स्वरूपाची ही राज्यातील पहिल्यापैकी किंवा एकमेव संकल्पना मानली जात असून त्यामुळे रत्नागिरीला एक वेगळी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या गॅलरीमध्ये विविध थोर व्यक्तिमत्त्वांची चित्रे, सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स, सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृती तसेच नामवंत कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक आणि उदयोन्मुख कलाकारांनाही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ही गॅलरी केवळ पर्यटन किंवा आकर्षणाचे केंद्र न राहता नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी मंच ठरणार आहे. स्कायवॉकचा वापर करणाऱ्या नागरिकांना प्रवासासोबतच कलेचा आनंद घेण्याची संधी मिळणार असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा एक वेगळा अनुभव ठरेल. कला रसिकांना विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जागा महत्त्वाची ठरणार आहे. रत्नागिरीच्या नागरी जीवनात कला, संस्कृती आणि सौंदर्य यांचा संगम घडवणारा हा उपक्रम शहरासाठी नवे आकर्षण निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून सुरक्षिततेसाठी उभारलेला स्कायवॉक आता कलेचा सेतू बनणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






