पुणे : ललित पाटील ड्रग्ज माफिया प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुण्यातून थेट लंडनला ड्रग्ज पाठवल्याचे तपासातून उघड झाले आहे. तब्बल २१८ किलोचे ड्रग्स संदीप यादवने कुरीयरने लंडनला पाठवले. पुणे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कुंरकुंभ येथे असलेली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केल्यानंतर याचे धागेद्वारे आता थेट लंडनपर्यंत पोचले तपासातून समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. माफिया संदीप धुणे उर्फ धुनिया याचा पंटर संदीप यादवने कुरकुंभ येथे तयार होत असलेले ड्रग्स थेट लंडनला कुरिअर मार्फत पाठवण्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थ केम लॅबोरटरीज या कारखान्यातून चालणाऱ्या या ड्रग्स उद्योगाचा छडा काही महिन्यापूर्वी पुणे पोलिसांनी लावला होता. ससून रुग्णालयातनं ड्रग्सचं रॅकेट चालवणारा ललित पाटील याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याचे धागेद्वारे प्रथम कुरकुंभ आणि तिथून आता थेट लंडनपर्यंत पोहचल्याचं उघड झाले आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील हा सध्या कारागृहात असून त्याचा सहकारी संदीप धुणे उर्फ दुनिया हा नेपाळमार्गे पळून गेला आहे. कुरकुंभमध्ये तयार होणारे ड्रग्ज हे कुरिअरच्या माध्यमातून लंडनपर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांना एक हजार ३३७ कोटी ६० लाख रुपयांचे ड्रग्ज हाती लागले असून याची व्याप्ती अजून मोठी असल्याची माहिती समोर येत आहे. याचा तपास आता एनसीबी करत आहे. पुण्यात तयार होणारे ड्रग्स मुंबई, सांगली, पश्चिम बंगाल, दिल्ली मार्गे लंडनला गेल्याची माहिती आता पोलिस तपासातून समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर २ कोटी १४ लाखांचे ड्रग्स सापडले होते. त्यानंतर हे सगळं मोठं ड्रग्स रॅकेट उघड झालं होतं. या रॅकटेचा तपास करताना अनेक मोठ्या व्यक्तींचा यामध्ये होत असल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणात पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. या चौकशीतून ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, कारागृह पोलिस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि ६ पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. सध्या या प्रकरणात ललित पाटील अटक असून तो सध्या येरवडा कारागृहात आहे.