मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर होताच, राजकीय पक्षांनी सभा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. १८ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपुष्टात येणार आहे. त्याआधी १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या चार पक्षांनी अर्ज केले आहेत. मुंबई महापालिका यावर पुढील आठवड्यांत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांचा मोठ्या सभांसाठी शिवाजी पार्क मैदानाला नेहमीच पसंती दिली जाते. या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठीही राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा त्या पक्षाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसासाठी चार राजकीय पक्षांनी अर्ज केले आहेत. यामध्ये मनसेकडून पहिला अर्ज केल्याचा दावा मनसेचे दादर-माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली. तर शिवसेना उबाठा पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि भाजपनेही अर्ज केल्याचे ते म्हणाले. एकापेक्षा जास्त अर्ज आले, तरीही नियमानुसार पहिला अर्ज करणाऱ्या पक्षालाच परवानगी दिली जाते. त्यामुळे मनसेलाच ही परवानगी मिळेल, असा दावा त्यांनी केला. १४ ऑक्टोबरला आणि १५ ऑक्टोबरलाही दुसरा अर्ज केल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांचे १० ते १२ अर्ज आल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.