पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहेत. आता गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात स्वारगेटजवळ गणेश क्रीडा मंदिराजवळ व्यापाऱ्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात व्यापारी गंभीर जखमी झाला होता. पुण्यात व्यापाऱ्यांवर गोळीबार करुन तीन जण फरार झाले होते. व्यापाऱ्याकडे असलेली रोकड त्यांनी लंपास केली होती. आता तिन्ही मुख्य आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. अभय कुमार सिंग, नितीश कुमार सिंग आणि मोहम्मद बिलाल शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपींकडून २ पिस्टलसह ३१ जिवंत काडतुसे पुणे पोलिसांनी जप्त केली आहे.
व्यापाऱ्यावर गोळीबार करुन आरोपी फरार झाले होते. पुणे पोलिसांनी बंगलोर येथून आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपीने व्यापाऱ्यावर स्वारगेट परिसरात गोळीबार केला होता. तेव्हा पासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी हल्लेखारांच्या दुचाकीवर “आई” हे नाव लिहिलेले दिसले. त्या एका क्लूवरुन पोलिसांनी सूरज वाघमोडे (वय २१) याला अटक केली. परंतु त्याच्यासोबत असलेले साथीदार फरार झाले होते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपी बंगळुरु येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्या ठिकाणी जाऊन अभय कुमार सिंग, नितीश कुमार सिंग आणि मोहम्मद बिलाल शेख या तिघांना अटक केली आहे.