नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीतील गावठाण आणि झोपडपट्टी भागात कचरा गोळा करण्यासाठी सद्या:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या घंटागाडी पद्धतीस पुरेशा प्रमाणात यश मिळत नसल्याने येत्या काळात या भागातील कचरा वाहतुकीची यंत्रणा प्रभावी पद्धतीने राबवली जावी यासाठी महापालिका प्रशासनाने नवी रचना उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भागात लहान आकाराची ई वाहने तसेच गल्लीबोळातून कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची कुमक ठेवली जाणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या नव्या कचरा संकलन व वाहतूक निविदेत प्रथमच ई कचरा गोळा करण्यासाठी विशेष व्यवस्था असणार आहे. त्यासाठी २० ई वाहनांचा वापर केला जाणार आहे. शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे महापालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.