नागपूर : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी रात्री अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत तेथील प्रवासी सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी केली. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर परतत असताना रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला ताफा अचानक बसस्थानकाकडे वळवला. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, मंत्र्यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता बसस्थानकातील विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, चालक-वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांची दयनीय अवस्था आणि स्वच्छतागृहांची खराब स्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळाकडून प्रत्येक तिकिटामागे स्वच्छता शुल्क आकारले जात असतानाही अशा प्रकारची परिस्थिती आढळल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान परिवहन मंत्र्यांनी चालक आणि वाहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विश्रांतीगृहात अपुऱ्या सुविधा, स्वच्छतेचा अभाव, एकच कुलर, तसेच बाहेरील व्यक्तींकडून जागेचा वापर होत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. याशिवाय पिण्यासाठी थंड पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व तक्रारी ऐकून सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल कठोर शब्दांत नाराजी नोंदवली. बसस्थानकातील स्वच्छतागृह आणि विश्रांतीगृह अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आढळल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुविधा आणि स्वच्छता याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे राज्यभरातील एसटी प्रशासनात खळबळ उडाली असून बसस्थानकांवरील सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे संकेत मिळाले आहेत.







