छत्रपती संभाजीनगर : नीट (NEET) परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला. नीट परीक्षेतील घोळामुळे एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला. देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. येत्या सहा दिवसांत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिपके यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणारे नेतृत्व देशातील पेपरफुटीच्या घटनांवर नियंत्रण का मिळवू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून जबाबदारी स्वीकारल्याशिवाय व्यवस्था सुधारणार नाही, असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर थेट जंतर-मंतर येथे गेलो असता मोठ्या संख्येने तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तरुण आता आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्यास तयार असून सरकारला घाबरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
आंदोलनकर्त्यांवर आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर होत असलेल्या टीकेचाही दिपके यांनी समाचार घेतला. सीबीएसईच्या एका विद्यार्थ्याने गुणपत्रिकेतील कथित त्रुटी समोर आणल्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात आल्याचा उल्लेख करत, प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा बेरोजगार तरुणांना देशविरोधी ठरवण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे, असे ते म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी नसून विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होत असले तरी त्यापैकी मोठ्या संख्येला रोजगार मिळत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांमध्ये मतदान करण्याइतकेच निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणे हेही लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांबाबतही आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असल्याचे सांगत संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांना लक्ष्य करणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.







