पुणे : स्वसंरक्षण हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून ते विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाची शिस्त आहे. प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे, असा संदेश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थिनींना दिला. विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘पिंक रूम’ ही नवी संकल्पना प्रत्येक शाळेत राबवण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे जिल्हा परिषद यांच्यातर्फे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियाना’च्या उद्घाटन कार्यक्रमात भुसे बोलत होते. ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज आणि त्यांच्या चमूने पुण्यातील ४७६ शाळांमधील सुमारे १२ हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
भुसे म्हणाले, प्रत्येकाने शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला पाहिजे. एखादी मुलगी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होते, तेव्हा तिचे मनोबल उंचावते आणि तिच्या संपूर्ण जीवनात एक शिस्त निर्माण होते. हीच शिस्त देशाला बलशाली बनवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी एकाच वेळी २ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत करून एक नवा विक्रिम प्रस्थापित केला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात सैनिकी प्रशिक्षणातून ‘राष्ट्र प्रथम आणि देश सर्वोच्च’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजवली जाणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कला, क्रीडा आणि स्वसंरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. या अभियानामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थिनी खऱ्या अर्थाने ‘निर्भय’ आणि ‘आत्मनिर्भर’ होतील, असेही भुसे यांनी नमूद केले. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण आणि जीवनकौशल्य अभियानासारखे उपक्रम ही काळाची गरज आहे. हे केवळ एक दिवसाचे प्रशिक्षण नाही, तर आयुष्यभराचे शिक्षण असावे. आपल्यातील शक्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मंजुषा नागपूरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनंदा वाखारे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास गरड वेळी उपस्थित होते.







