मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या एका घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वापरातील खाजगी विमानात ९ जून रोजी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीकडे जाण्यासाठी विमान सायंकाळी ५ वाजता उड्डाण घेणार होते. मात्र उड्डाणापूर्वीच वैमानिकाच्या निदर्शनास काही तांत्रिक अडचणी आल्याने विमान तत्काळ थांबविण्यात आले. या बिघाडामुळे विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आणि संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या कारणामुळे नियोजित वेळेत उड्डाण होऊ शकले नाही आणि विमानाला सुमारे दोन तासांचा विलंब झाला. सुदैवाने, उड्डाणापूर्वीच बिघाड लक्षात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतरच विमानाला पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.
या विमानात सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे तसेच खासदार प्रफुल्ल पटेल हे प्रवास करत होते. सर्व नेते दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी रवाना होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित विमान हे ‘व्हीएसआर’ कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हेच विमान रात्री ७ वाजता दिल्लीकडे रवाना झाले आणि सर्व प्रवाशांनी पुढील प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. या घटनेनंतर व्हीएसआर कंपनीच्या विमानांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही या कंपनीच्या विमानांबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही राजकीय नेत्यांनी विमानांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षाविषयक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. मात्र या ताज्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने प्रशासन आणि संबंधितांच्या वर्तुळात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.







