वसई : मिरारोडमधील काशिमिरा नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्मारक परिसरात उघड्यावर मद्यपान होत असल्याच्या तक्रारी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना रोखल्याची घटना समोर आली आहे. काशिमिरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती काही व्यक्ती संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मद्यपान करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे परिसरातील वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना हटविले. या घटनेदरम्यान झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आदराचे आणि प्रेरणेचे स्थान असल्याने त्याच्या परिसरात अशा प्रकारचे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.







