मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ही या प्रकरणातील १६ वी अटक आहे. या प्रकरणी आरोपी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (वय २३) याला अटक केली आहे. तो कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. यापूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ३२ वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली होती. त्याने परदेशातील गुंडाशी संपर्क साधला होता. सिंह याने विविध समाज माध्यमांतून अनेक खात्यांद्वारे त्याच्याशी संवाद साधला. तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे.
या प्रकरणी आतापर्यंत सहा पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पाहिजे आरोपी शुभम लोणकर व मोहम्मद झिशान अख्तर यांना बाबा सिद्दिकींच्या हत्या करण्याच्या कटाची माहिती होती आणि त्यातील सिंह हा अनमोल बिश्नोईशी संपर्कात होता. त्याने इतर आरोपींना पैसे पुरवले आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यात सहभागी होता. सिंह याने गुन्हा घडण्याच्या एक महिना आधी मुंबई सोडली. त्याला लुधियानामध्ये अटक करण्यात आली. सिंह बब्बू म्हणून प्रचलित आहे. तसेच तो या प्रकरणातील आरोपी मोहम्मद झिशान अख्तर याच्याशीही संपर्क साधत होता. त्यानंतर तो चार ते पाच महिन्यांपूर्वी सप्रे आणि इतर आरोपींच्या संपर्कात आला. सिंह विरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, पण पोलीस त्याबाबत पडताळणी करत आहेत.