अंबरनाथ : अंबरनाथ शहरात असलेल्या पाणी समस्येला वैतागून नागरिकांनी आता ‘नो वॉटर, नो वोट’ असा नारा दिला आहे. अंबरनाथमध्ये पाण्याची समस्या कायम जाणवत असून पाण्याची हि समस्या मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी मोहिमेतून देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष व उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मतदारांच्या भेटी घेत कामांची पूर्तता करण्याबाबत आश्वासन देत आहेत. मात्र अंबरनाथमध्ये नागरिकांना पाण्याची समस्या कायम भेडसावत असून यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे येथी नागरिकांनी विधानसभा निवडणुकीची संधी साधत नो वॉटर नो वोट अशी मोहीम हाती घेतली आहे.
अंबरनाथ पश्चिम भागात पटेल प्रयोशा गृहसंकुल असून तिथे १२ इमारतींमध्ये १५०० कुटुंबं वास्तव्याला आहेत. या संकुलात मागील ८ वर्षापासून पाण्याची समस्या आहे. याबाबत मागण्या, निवेदनं, आंदोलनं, नगरपालिकेवर मोर्चा असं सगळं काही करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळं आता ‘नो वॉटर नो वोट’ असा नारा या संकुलातील रहिवाशांनी दिला आहे. याचा सर्वच पक्षाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. त्यामुळं नेतेमंडळींनी फोडलेल्या नारळातच पाणी येतं? की आता नळालाही पाणी येतं? हे पाहावं लागेल.