मुंबई : राज्यात दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच विविध गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली असून, सरावादरम्यान होणाऱ्या संभाव्य अपघातांचा विचार करून महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने यंदा विशेष अपघाती विमा योजना जाहीर केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत सराव करणाऱ्या प्रत्येक गोविंदाला दहा लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच सरावादरम्यान अपघात झाल्यास रुग्णालयातील उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्चही विम्याअंतर्गत उपलब्ध करून दिला जाणार आहे. दहीहंडीपूर्वी अनेक मंडळे दोन ते अडीच महिने सातत्याने सराव करतात. उंच मानवी मनोरे उभारताना तोल जाणे, खाली पडणे, हात-पायांना फ्रॅक्चर होणे, डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत होणे अशा घटना दरवर्षी घडत असतात. अनेकदा अशा अपघातांमुळे उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन सरावादरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना आर्थिक आधार मिळावा आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढावी, या उद्देशाने ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यातील ९० हून अधिक गोविंदा मंडळांनी सराव सुरू केला असून, स्पर्धात्मक वातावरणामुळे अधिक उंच आणि भक्कम मानवी मनोरे उभारण्यासाठी सरावाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे सरावाच्या काळातही अपघाताचा धोका कायम असल्याने गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने पुढाकार घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीशी चर्चा करून ही योजना सुरू केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली.
या विशेष विमा योजनेचा कालावधी ७५ दिवसांचा असून, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत विमा संरक्षण लागू राहणार आहे. १४ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व गोविंदांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, ७१ ते ७५ वर्षे वयोगटातील प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यासाठी ११० रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला असून, मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह चर्चगेट येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात नोंदणी करून हा हप्ता भरावा लागणार आहे. असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, ही योजना विशेषतः दीर्घकालीन सराव करणाऱ्या मंडळांसाठी लागू आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेपासून दहीहंडी उत्सवापर्यंत स्वतंत्र विमा संरक्षण योजना राबविली जाते. मात्र, यंदा सरावाचा कालावधी लांब असल्याने आणि त्या काळातही अपघाताचा धोका लक्षात घेऊन अतिरिक्त विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडी हा साहस, संघभावना आणि परंपरेचा उत्सव असला तरी सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व असल्याचे असोसिएशनने अधोरेखित केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व गोविंदा मंडळांनी या योजनेचा लाभ घेऊन सुरक्षित सरावाला प्राधान्य द्यावे आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.







