छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आगामी काळातील आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीची दिशा स्पष्ट करत प्रत्यक्ष निवडणुका लढविण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी ‘दबाव गट’ म्हणून कार्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत, देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने संघर्ष करणार असल्याचे सांगितले. याच वेळी त्यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंवाद मोहिमेची घोषणाही केली. सप्टेंबरपासून महाराष्ट्रासह देशभर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे विद्यार्थी, तरुण, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेच्या केंद्रस्थानी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या समस्या, शिक्षण शुल्कातील प्रचंड वाढ, प्रशासकीय दिरंगाई आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत अडचणी हे प्रमुख मुद्दे असतील. रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण रोखण्यासाठी व्यापक जनजागृती आणि जनमत तयार केले जाईल, असे दीपके यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावर टीका करत अभिजित दीपके यांनी शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चिंता व्यक्त केली. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीच अनेक ठिकाणी वर्षाला एक ते दोन लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असून, त्याशिवाय डोनेशनचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबांना एवढा खर्च परवडणे अशक्य असल्याने शिक्षण व्यवस्था अधिक परवडणारी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शालेय शिक्षणाबरोबरच महाविद्यालयीन शिक्षण आणि कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कावरही त्यांनी टीका केली. उच्च शिक्षणासाठी पालकांना मोठी कर्जे घ्यावी लागत असून, त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. शिक्षण महाग करणाऱ्या घटकांविरोधात, प्रशासकीय दिरंगाईविरोधात आणि लोकहिताच्या प्रश्नांवर व्यापक जनमत तयार करून सरकारवर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दीपके यांनी सांगितले. तसेच, ही मोहीम केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांनाही वाचा फोडणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





