मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या निर्णयांतर्गत इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली होती. आता सहावीच्या अभ्यासक्रमालाही राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाल्याने येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम राज्यभर लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, काठिण्यपातळी आणि कौशल्याधारित शिक्षण लक्षात घेऊन हा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्य सुकाणू समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रारूप आता अभ्यासक्रम समन्वय समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बालभारतीमार्फत नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू केली जाईल आणि शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करून दिली जातील. दरम्यान, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक प्रशिक्षणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षण कार्यक्रम याच महिन्यात आयोजित केला जाणार असून त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समजून घेण्याची क्षमता, कौशल्यविकास आणि अनुभवाधारित शिक्षणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.







