भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी ‘फीडिंग स्पॉट’ उभारले आहेत. यामुळे दुर्गंधी तसेच प्राणीप्रेमी आणि नागरिकांमधील संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर शहरात सध्या जवळपास ३० हजारांहून अधिक मोकाट श्वान आहेत. हे श्वान शहरातील विविध भागांमध्ये विखुरलेले असून अनेक रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले दिसतात. महत्त्वाची बाब म्हणजे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी या श्वानांना अन्न उपलब्ध होणे कठीण होत आहे. हे श्वान प्रामुख्याने कचरा पेट्यांजवळ वावरत असून तिथे मिळणारे खाद्य खात असतात. या समस्येवर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत श्वानांना अन्न देणारा प्राणीप्रेमी वर्ग तयार झाला आहे.
काहीजण रात्री उशिरा मोकाट श्वानांना अन्न, अंडी आणि चिकन देतात. मात्र हे खाद्य पदार्थ शहरातील कुठेही टाकले जात असल्याने प्राणीप्रेमी आणि मोठ्या गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. अनेकदा हा वाद इतका विकोपाला जातो की त्याची नोंद पोलीस ठाण्यातही होते.हा संघर्ष टाळण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पशुसंवर्धन विभागासाठी मंजूर असलेल्या निधीतून टप्प्याटप्प्याने ‘फीडिंग स्पॉट’ उभारण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली.







