भाईंदर : भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या चार वर्षीय नर बिबट्याचा सोमवारी मृत्यू झाला. हा बिबट्या डिसेंबरमध्ये जेरबंद केल्यानंतर नैसर्गिक अधिवास असलेल्या येऊरच्या जंगलात सोडण्यात आला होता. येऊर वनक्षेत्रातील नागला परिसरात त्याचे शव आढळून आले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाईंदर पूर्वेतील तलाव रोड या वर्दळीच्या भागात १९ डिसेंबरला सकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर त्याने एका इमारतीत शिरून सात जणांवर हल्ला केला होता. या घटनेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले होते. सुमारे सात तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबरला येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला भागात बिबट्याला मुक्त करण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट ट्रॅकिंग कॉलर लावण्यात आला होता. त्यानंतर तो नियमित जंगलात शिकार करत असल्याचे आणि सुदृढ असल्याचे निरीक्षणा त आले होते. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सॅटेलाइट कॉलरद्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा संदेश वन विभागाला मिळाला. त्यानंतर पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.







