मुंबई : रेल्वेच्या हद्दीत रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून यंदा पालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या हद्दीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या कल्व्हर्टच्या सफाईची जबाबदारी पालिकेच्या अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. रेल्वेकडून कल्व्हर्ट स्वच्छ करून घ्यावे आणि रेल्वेने न केल्यास ते पालिकेच्या यंत्रणेकडून करून घ्यावे. तसेच कल्व्हर्ट स्वच्छ झाल्याचा अहवाल ३१ मे पर्यंत द्यावा अशी जबाबदारी पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. चर्चगेटपासून ते पश्चिम उपनगरात दहिसरपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ते मुलुंड, मानखुर्द पर्यंतचा रेल्वे रुळांचा भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. या रेल्वे रुळांवर विविध ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कल्व्हर्ट आहेत. पावसाळ्यापूर्वी हे नाले साफ करून घ्यावे लागतात. त्याकरीता पालिका दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेला या कामासाठी निधी देत असते. मात्र रेल्वेच्या यंत्रणेने हे नाले साफ केले की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी यंदा अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. हे कल्व्हर्ट साफ झाले नाही तर रेल्वे रुळांवर पाणी तुंबण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेने ही खबरदारी यंदा घेतली आहे.





