मुंबई : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे हिवताप आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार डास प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधित करणे, अळीनाशकांची फवारणी करणे, बांधकामाच्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. या आजारांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी विविध परिसरातील पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही केली आहे. गेल्या वर्षीचा हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाहता यंदा प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय ६७ यंत्रणांच्या परिसरात मिळून एकूण २९ हजार १९ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी २२ हजार ५६८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. पावसाळापूर्व कामांमध्ये विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही ७७.७७ टक्के पूर्ण झाली आहे, तर २२.२३ टक्के पाण्याच्या टाक्याच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्याची गरज आहे. तसेच प्रतिबंधाच्या अनुषंगाने पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे.
पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट आदी ठिकाणीही डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे या ठिकाणांसह बांधकामांच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. झोपडीवासीयांच्या भागात पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू शोधून निष्कासित करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. त्यासोबतच डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.