मुंबई : मुंबईकरांनी आज सायंकाळपासून सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात गडगडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पूर्वेकडून येणाऱ्या ढगांमुळे, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमी वारे वाटचाल करतील. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारपासून राज्यात पाऊस सुरू होईल असे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस पडला. मुंबईत प्रामुख्याने गुरुवारी मध्यरात्री पावासाचा जोर अधिक होता. दादर, परळ, वरळी, प्रभादेवी या परिसरात साधारण एक तास पाऊस कोसळत होता. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. शक्यतो मुंबईत पावसाचा जोर हा सायंकाळनंतर राहील. त्यानंतर मध्यरात्रीही पावासाचा जोर कायम राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबरोबरच कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.







