मुंबई : उपचाराच्या बहाण्याने १६ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. गोवंडी परिसरात हा प्रकार घडला.
पीडित मुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे ती परिसरातील नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी तपासण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला अश्लीलरित्या स्पर्श केला. सुरूवातीला पीडित मुलीने दुर्लक्ष केले पण त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या कपड्यांना हात घातला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. आरोपीने घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची पीडित मुलीला धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीला तपासणीसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार याप्रकरणी डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुलीने याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ७५ व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी डॉक्टरला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. आरोपी डॉक्टरला याप्रकरणी तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.







