मुंबई : मुंबई विद्यापीठाने सामाजिक समता, समावेशक प्रशासन आणि प्रशासकीय नेतृत्व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या ‘अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व पीएम केअर्स बालक योजना लाभार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन योजना’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात यासंदर्भात नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या वतीने या करारावर कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने संचालक मनोज तिवारी यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी. डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक डॉ. संतोष राठोड आणि डॉ. आंबेडकर फाउंडेशन रविकांत त्रिपाठी आदी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्ड, बँकिंग, इन्शुअरन्स, पीसएयू, क्लॅट, जीआरई, जीमॅट, सॅट आणि आयइएलटीएस- टॉफेल अशा केंद्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, अध्ययनसामग्री आणि वैयक्तिक सल्ला आणि समुदेशनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही योजना अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसह पीएम केअर्स बालक योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.







