ठाणे : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साकेत पोलीस मैदान येथे सकाळी ९.१५ वा.संपन्न होणार आहे. ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० पूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा.
ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. ख़राब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी अशा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







