मुंबई : मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवेसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास वाचणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन’ हे देशातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी त्याचे अनावरण करण्यात आले. यातून एकाच क्यूआर कोडद्वारे विविध परिवहन सेवांमधून प्रवास करता येणार आहे. ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने पाऊल उचलत एक ॲप-अमर्याद प्रवास या घोषवाक्याखाली हे ॲप विकसित केले आहे. ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांत असून त्यातून प्रवाशांना भाषेची अडचण येणार नाही. ॲप दररोज १ ते १.५ लाख व्यवहार सुरळीतपणे हाताळू शकेल. तर सर्व्हर दररोज कमाल ५० लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ॲपचे फायदे
प्रवासासाठी वेगवेगळे बुकिंग आणि वेगवेगळी तिकिटे काढण्याच्या त्रासातून मुक्तता
तिकिटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही
कागदी तिकिटांचा वापर घटणार. पर्यावरणपूरक प्रवासाला चालना
शेअर माय लोकेशन आणि आपत्कालीन हेल्पलाइनसारखी प्रवासी सुरक्षेची फीचर्स त्यात आहेत. त्यातून प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल.
पंतप्रधान मोदी यांनी वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकीकरण (Integration) व्हायला हवे, असे सांगितले होते. याच दृष्टिकोनातून आज ‘मुंबई वन’ या ॲपचा शुभारंभ करण्यात आला. मेट्रो, मोनो, बस, सबअर्बन रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सगळ्यांसाठी आता एकच तिकीट असेल. एकाच ‘प्लॅटफॉर्म’वर सर्व तिकीट आणि ‘ट्रॅव्हल प्लॅन’ही उपलब्ध होईल. मुंबईला सुगम बनवण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आज उदघाटन, लोकार्पण आणि शुभारंभ करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांसाठी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.







