मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखालील पथक पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू करणार आहे. या चाचण्या पूर्ण करून आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मे २०२६ अखेरपर्यंत मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. देशातील एकमेव मोनोरेल प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गिकेला अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळाला नसला तरी काही भागांतील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची मानली जाते. मात्र, सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड आणि अपघातांमुळे सप्टेंबर २०२५ पासून ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. विशेषतः ऑगस्ट २०२५ मध्ये दोन मोनोरेल गाड्या एकाच दिवशी कलंडल्याच्या गंभीर घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्या वेळी काही प्रवासी बराच वेळ गाडीत अडकून पडले होते आणि त्यांना दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले होते. या घटनेनंतर एमएमआरडीएवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
यानंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी मोनोरेल सेवा पूर्णपणे बंद करून संपूर्ण मार्गिकेचे अत्याधुनिकीकरण, तांत्रिक सुधारणा आणि नवीन गाड्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही महिन्यांत या सर्व कामांची अंमलबजावणी करण्यात आली असून आता अंतिम टप्प्यात सुरक्षा चाचण्यांची प्रक्रिया सुरू होत आहे. मेट्रोच्या धर्तीवर मोनोरेलसाठीही व्यापक सुरक्षा तपासण्या करण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रवासी सेवा पुन्हा सुरू केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सीएमआरएस चाचण्यांची सुरुवात म्हणजे मोनोरेलच्या पुनरारंभाची अंतिम प्रक्रिया मानली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. मोनोरेल मार्गिकेवरील व्हीएन पुरवठा नगर (VPN) आणि आरसी मार्ग जंक्शन स्थानकांना ‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम–मंडाळे, मानखुर्द) मार्गिकेवरील चेंबूर मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो आणि मोनोरेल यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार असून प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात येत आहे.







