मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम अखेर सुरू झाले असून तीनही पॅकेजअंतर्गत एकूण पाच ठिकाणी गाळ काढण्यात येत आहे. सुमारे ५७ दिवसांमध्ये नालेसफाईचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. नालेसफाईच्या प्रगतीचे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण करण्यात येणार असून त्यात दररोज अद्ययावत माहिती समाविष्ट करावी. दरम्यान, नाल्यांतील तरंगता कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शक्य तेथे ट्राश ब्रूम यंत्रणा बसवावी, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई आणि नद्यांच्या स्वच्छतेची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी नियोजनावर भर दिला जात आहे.
या अनुषंगाने मुंबईतील लहान व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच मिठी नदी व पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. मिठी नदीतून एकूण पाच ठिकाणाहून गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे तीन पॅकेजमध्ये केली जाणार आहेत. वांद्रे – कुर्ला संकुलातील मिठी नदीजवळील कनेक्टर ब्रिज येथे बांगर यांनी भेट दिली. मिठी नदीच्या संपूर्ण लांबीमध्ये गाळ काढण्याच्या ठिकाणांचे नियोजन करावे. ज्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे आणि ज्या ठिकाणी मिठी नदीचे पात्र अरुंद आहे अशा ठिकाणी नालेसफाई अधिक काळजीने करावी, नालेसफाई करताना योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना बांगर यांनी केली. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) येथे मिठी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या ठिकाणी अवैधरित्या राडारोडा टाकला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राडारोडा टाकल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.







