पुणे : पुणे शहराची ओळख बनलेली ‘एमएच 12’ (MH 12) ही वाहन नोंदणी मालिका आता अधिकृतपणे संपली असून, यापुढे पुणे शहराची नवी ओळख ‘एमएच 61’ (MH 61) या आरटीओ कोडने होणार आहे. अनेक दशकांपासून पुण्यात नोंदणी होणाऱ्या वाहनांवर ‘एमएच 12’ ही मालिका झळकत होती. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर पुढील आरटीओ कोड कोणता असणार, याबाबत वाहनधारक, वाहन विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विविध तर्कवितर्क आणि चर्चांनंतर अखेर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘एमएच 61’ ही नवी मालिका निश्चित केली आहे. ही मालिका उद्या किंवा सोमवारपासून अधिकृतपणे सुरू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. नवीन मालिका सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पसंतीच्या (चॉईस) क्रमांकांसाठी आतापर्यंत ११०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष क्रमांक घेण्यासाठी नागरिकांची नेहमीच मोठी उत्सुकता असते आणि नव्या मालिकेमुळे यावेळीही आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. वाहन क्रमांक हा अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय मानला जात असल्याने ०००१, ०००७, ००९९, ९९९९ यांसारख्या आकर्षक क्रमांकांसाठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे नवीन मालिका सुरू होण्यापूर्वीच आरटीओ कार्यालयात चॉईस नंबरसाठी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. पुणेकरांनी नव्या मालिकेचे स्वागत करत हीच पुण्याची पुढील ओळख ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनायक व्ही. साखरे यांनी सांगितले की, ‘एमएच 12’ची शेवटची मालिका दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १ ते ६० पर्यंतचे आरटीओ कोड विविध जिल्हे आणि उपविभागांना वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील उपलब्ध असलेला ‘एमएच 61’ हा नवीन क्रमांक पुणे शहरासाठी निश्चित करण्यात आला आहे. नव्या मालिकेनुसार चारचाकी वाहनांसाठी ‘एमएच 61 ए’ आणि दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच 61 बी’ ही नोंदणी मालिका सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता पुण्यात नोंदणी होणाऱ्या सर्व नव्या वाहनांवर ‘एमएच 61’ ही ओळख दिसणार आहे. वाहन विक्रेते आणि डिलर्सनीही नव्या मालिकेनुसार आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण केली असून, वाहन नोंदणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आरटीओ प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. नव्या कोडमुळे वाहनधारकांच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही बदल होणार नसला, तरी पुण्याच्या वाहन ओळखीत ऐतिहासिक बदल होणार आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच शहराच्या आरटीओ कोडमध्ये बदल होत असल्याने हा बदल पुणेकरांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात ‘एमएच 61’ ही मालिका पुण्याची नवी ओळख म्हणून राज्यभर आणि देशभरातील रस्त्यांवर झळकणार असून, नव्या मालिकेची सुरुवात शहराच्या वाहन इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






