मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स, दुकाने तसेच खाद्य व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक कारवाई केली आहे. २५ आणि २७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अमरावती विभागातील अकोला एमआयडीसी परिसरातून तब्बल ७,०२६.८ किलो संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले. या तेलाची अंदाजे किंमत ११ लाख ८२ हजार ६५० रुपये असून, भेसळ आणि नियमभंगाच्या संशयावरून ते प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. याचवेळी मुंबईतील बीकेसी, दादर, कलिना आणि चेंबूर परिसरातील चार हॉटेल्स व खाद्य व्यवसायांचे परवाने गंभीर त्रुटी आढळल्याने तात्काळ निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर राज्यात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश देत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तपासादरम्यान अकोला एमआयडीसीतील काही व्यावसायिकांकडे ‘रीपॅकर’चा परवाना असतानाही बेकायदेशीरपणे खाद्यतेलाचा व्यापार सुरू असल्याचे उघड झाले. मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण या आस्थापनाकडे आवश्यक प्रयोगशाळा सुविधा नसल्याचे आणि सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ३,४२८.४ किलो तेल, ज्याची किंमत ६ लाख २१ हजार ३०० रुपये आहे, ते जप्त करण्यात आले. तर मे. भारतकुमार अँड ब्रदर्स येथे तेलाचा पुनर्वापर आणि भेसळीचा संशय आढळल्याने ३,५९८.४ किलो तेल, किंमत ५ लाख ६१ हजार ३५० रुपये, सील करण्यात आले. या दोन्ही कारवायांमुळे एकूण सुमारे सात टन खाद्यतेल प्रशासनाच्या ताब्यात गेले आहे.
मुंबईतही एफडीएने व्यापक तपासणी मोहीम राबवत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आणल्या. तपासणीनंतर बीकेसीतील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी, दादरमधील मारियन हॉटेल अँड रेस्टॉरंट, कलिनातील अक्षय कटर्स आणि चेंबूरमधील भगवती स्टोअर्स या चार खाद्य व्यवसायांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वयंपाकघरात कृत्रिम रंग आणि अजिनोमोटोचा अतिरेकी वापर, वारंवार वापरून काळवंडलेले खाद्यतेल, झुरळांचा प्रादुर्भाव, जिन्याखाली उघड्यावर ठेवलेला शिजवलेला भात, गंजलेली भांडी आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. काही आस्थापनांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकाच कटिंग बोर्डचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले, ज्यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले. एफडीएने अशा प्रकारच्या निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय वाटल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबईतील ज्या ४ हॉटेल्स/आस्थापनांचे परवाने निलंबित झाले:
- मे. अक्षय कॅटरर्स (Akshay Caterers) – विद्यानगरी कॅम्पस, कलिना
- क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (Craftpac Hospitality) – गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर, बीकेसी (BKC)
- इंड्रो हॉटेल अँड रेस्टॉरंट (Indro Hotel & Restaurant) – गोखले रोड, दादर
- भगवती स्टोअर्स / राधिका रेसिडेन्सी (Bhagwati Stores / Swiggy) – टिळकनगर, चेंबूर






